पहिल्यांदा एका मैत्रिणीच्या स्टेटस ला पहिलं, मग थोड्या दिवसांनी अजुन एका मैत्रिणीनी प्रोफाइल फोटो म्हणुन लावला. परत बघते तर काय आणखीन एका स्टेटस ला हा परत हजर ! म्हणलं चाललंय काय आता माझ्या स्वप्नात यायचं बाकी आहे, असं म्हणलं आणि त्या दिवशी स्वप्नात, जास्वंदाचं झाड लालबुंद टपोऱ्या फुलांनी लगडलेलं !! मी स्वप्नातच इतकी खुश झाले. खुप दिवसांपासुन घरात जास्वंदाचं रोप लावायचयं असा डोक्यात चाललं होतं पण मुहूर्त येत नव्हता. स्टेटस वाल्या मैत्रिणीला वेळ न दवडता दुसऱ्या दिवशी सकाळी विचारलं कुठे मिळाला तुला आपला very own जास्वंद, म्हणली लंडन मधल्या एका शॉप मधुन आणलंय मी. आता जास्वंदाचं रोप आणायला लंडन पर्यंत जायचं कि नाही, विचाराधीन प्रश्न. त्याला तसंच मनात घोळवत ठेऊन मी move on केलं, अजुन मुहूर्त आलेला नसेल कदाचित.
असो, इथे समर हॉलिडेज मध्ये कुठेतरी जायचं म्हणुन चाललं होतं. खूप ऑपशन्स बघुन शेवटी या आधी ३ वेळा गेलेल्या ठिकाणी म्हणजे कॉर्नवॉल ला जायचं ठरलं पण या वेळी न पाहिलेल्या जागा पाहू असं म्हणत मनाला जस्टिफिकेशन दिलं. आपण भारतात उन्हाळ्याच्या सुट्टीत कसं थंड हवेच्या ठिकाणी जातो तसं इथे गरम हवेच्या ठिकाणी जायची फॅशन आहे. कॉर्नवॉलचे बीच खुप सुंदर आहेत, इथलं पाणी Celtic sea चं असल्याने बऱ्यापैकी गरम असतं. आम्ही राहतो तिकडे आहे North sea, त्यामुळे temperature २५ डिग्री जरी गेले तरी पाय बुडवून माणूस २.५ मिनिटाच्या आत किनाऱ्यावर येणार एवढं गार असतं. तरीही इथली लोकं त्यात swimming करतात ही गोष्ट वेगळी. तर बॅक टू कॉर्नवॉल, सुंदर landscape, सगळीकडे हिरवा रंग त्याला कॉम्प्लिमेंट करणारं निळं आकाश, त्यात कापूस पिंजारल्यासारखे ढगांचे पॅटर्न आणि या सगळ्याला सोने पे सुहागा करणारं निळं पाणी असणारे बीच.
बीचवर मनसोक्त पाण्यात खेळायचं आणि टॅन होऊन परत असं रुटीन अनेक दिवस झाल्यावर घरी जायच्या आधी एक दिवस वेगळं काहीतरी बघायला जाऊयात असा विचार चालला असताना ईडन प्रोजेक्ट हे नाव आठवलं. ईडन प्रोजेक्ट म्हणजे बघण्यासारखी जागा आहे, मॅनमेड जागा आहे पण त्यातले कष्ट कळले कि त्या जागेचे अजूनच जास्त कौतुक वाटतं. तिथे आधी खाणी होत्या, त्याच जागेमध्ये आता त्यांनी ३ मोठे बायोम उभे केलेत. हे बायोम म्हणजे अजस्त्र डोम जे आतुन temperature controlled आहेत, त्यात त्यांनी अनेक ऊष्ण कटिबंधातली झाडं लावली आहेत.
यातल्या एका बायोम मध्ये, रेनफॉरेस्ट बायोममध्ये आपली खूप झाडं, फुलझाडं लावलेली दिसली, अगदी वडाच्या झाडापासुन ते आपल्या जास्वंदापर्यंत. Whatsapp स्टेटस, प्रोफाईल फोटोत पाहिलेला तो जास्वंद आता महिन्याभरात माझ्या समोर येऊन उभा आहे, actually मी त्याच्यासमोर येऊन उभी आहे आणि तेही इथे UK मध्ये !! मॅनिफेस्टेशन विषयी खूप वेळा वाचलंय, बरंच काही ऐकलंय पण अनुभवायला मिळणं म्हणजे मज्जा…!!
सगळ्यात पहिला दिसला तो म्हणजे पिवळी धम्मक टपोरी फुलं असलेला जास्वंद. तो तिथला टॉप सेलिब्रिटी होता, त्याच्या आजुबाजूला सगळी लोकं line लावून सेल्फी काढण्यात गुंग दिसत होती. खरा सेलिब्रिटी असता तर मी काही फोटो वगैरे काढायच्या फंदात पडणार नाही पण याला कसा रेसिस्ट करू म्हणून थांबले line मध्ये, Photo with Yellow Hibiscus ! थोडं पुढे गेलो तर आपल्या गणपती बाप्पाचा आवडता लाल जास्वंद. आधीचा सेलिब्रिटी होता खरा पण हा गणपती बाप्पा चा favourite मग याला तर special place ! लालेलाल फुलं बघत अजून थोडे पुढे गेलो तर झाड जास्वंदाचं आहे पानावरुन कळत होतं पण फुलं नीट दिसत नव्हती जरा डोकावून पहिलं तर जास्वंद पण नाजुक कातरकाम केलेल्या पाकळ्या असं फुल होतं ते. असं जास्वंदाचं फुल मी आजपर्यंत पहिला नाहीए. इतकं नाजुक कट वर्क पाकळी न पाकळी ला केलेलं, निसर्गाची करणी आणि नारळात पाणी आठवलं मला एकदम.
पुढे काही झाडांच्या आजुबाजूला तळहाताएवढे छोटे गोड पक्षी पण होते. आम्ही जसे झाडं प्रेमी तसे चिरंजीव पक्षीप्राणी प्रेमी. मग चिरंजीव त्या बारक्या पक्ष्यांमागे आणि आम्ही चिरंजीवांच्या मागे मागे असं करत आम्ही एक्सिट पर्यन्त येऊन पोचलो. एक्सिट ला प्लांट शॉप आहे हे मी आधीच हेरुन ठेवलं होतं. लांबूनच जास्वंदानी मला बोलावलं, मीही खरंतर त्यालाच शोधत होते. पण माझ्यासारखा अनेकांना त्यानी बोलावलं होतं. इथल्या लोकांना ते जास्वंदाचं फुल फारच आवडलं होतं. रोपं कमी होती आणि लोकं बरीच गर्दी करत होते. माझा जीव वरखाली व्हायला लागलं म्हणालं आपल्याला उरतंय कि नाही पण तेवढ्यात अहो मला विजयी मुद्रेने हातात एक फुलांनी बहरलेलं जास्वंदाचं रोप घेऊन येताना दिसले. मग मीही त्याच विजयी आविर्भावात आजुबाजूला एक नजर टाकली.
फार हाव बरी नसते हे मला इथे आठवायला हवं होतं पण वेळेत अश्या गोष्टी आठवत नसतात त्या नंतर आठवतात. अजुन काही interesting रोपं दिसत आहेत का बघत तिथेच रेंगाळत बसले तर skirt वर नाजुक कट वर्क असावं तसा तो जास्वंद होता ना तिथेच, माझी वाट बघत. त्याला फुलं नसल्या कारणानी तो लोकांच्या नजरेत विशेष येत नव्हता. पटकन जवळ जाऊन त्यालाही शॉपिंग कार्ट मध्ये बसवलं. तेवढ्यात मागुन अहोंनी dwarf banana चं गोंडस झाड आणलं. मी, अहो आणि आमचं gardening चं प्रेम continues….
इतका आनंद, इतका आनंद, तो गगनात मावेना, स्वप्नात पाहिलेला, समोर आलेला आता घरी येणार… खरेदी करेपर्यंत आपण कॉर्नवॉल मध्ये आहोत, आपलं घर इथे अर्ध्या तासावर वगैरे नसुन साधारण ७/८ तासांवर आहे, आपल्या गाडीतून आधीच सामान ठुस ठुस के भरलंय, खाऊ पाहिजे खाऊ पाहिजे हा आपलाच हट्ट असल्या कारणाने २ पिशव्या एक्सट्रा केल्या असुन त्यात आपण आता हे ३ नाजुक सेलिब्रिटी कसे बसवणार याचा जरादेखील विचार मी मनाला शिवू दिला नाही.
तिथुन एअर बी&बी पर्यंत चा प्रवास काय सोपा होता पण घरी परत निघायच्या दिवशी मात्र जागा कुठेच दिसेना, म्हणलं मांडीत घेऊन बसू आता, सासूबाई बिचाऱ्या स्वतः अवघडून बसत म्हणाल्या मागे दे, माझ्या पायाशी ठेवते. हाव स्वतःची आणि अवघडून प्रवास त्यांना, मनाला काही पटेना मग पुढेच दोन रोपांना पायात म्हणजे पाय लागू न देता कडेला ठेवलं. Partner in crime अहोंनी पण मोठ्या मनानी कप होल्डर मध्ये बनाना च्या रोपाला बसवलं. हि अडजस्टमेन्ट होण्याआधी जर कोणी समोरून येताना आम्हाला पहिला असतं तर ड्राइवर सीट च्या शेजारी काचेतून २ जास्वंदच दिसली असती. मी गाडीत बसल्यावर माझ्या डोक्यापेक्षा उंच येत होती ती रोपं. परतीच्या वाटेवर एक २/३ दा थांबलो असू ब्रेक साठी, जर कोणी आत डोकावून पाहिलं असतं, ३ मोठी माणसं, एक लिंबुटिंबू, ३ रोपटी आणि दिसेल त्या जागी कोंबलेल्या खाऊच्या पिशव्या, तर एखादा साष्टांग घातला असता. इथल्या लोकांना साष्टांग म्हणजे काय हे माहित नाही ती गोष्ट निराळी.
तर साता समुद्राचा प्रवास करून आणि आमच्या बरोबर हा असा ७ तासांचा प्रवास करून जास्वंदाची रोपं घरी सुखरूप पोहोचली आहेत आणि आता लवकरच माझ्या पण Whatsapp स्टेटस ला झळकणार आहेत, लोकांना inspiration पुढे pass on करावं असं म्हणतात !
©️ शिल्पा कुलकर्णी